त्या ज्येष्ठ नेत्याच्या नातवावर बिबट्याचा धक्कादायक हल्ला

महाराष्ट्र

सातारा: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे गावात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात अधिराज पाटील यांना पायाला दुखापत झाली, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर, जे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) चे नेते आहेत, येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. प्रचारासाठी जात असताना, उंडाळे गावात बिबट्याने अधिराज पाटील यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यांच्या सोबत असलेले दुचाकी चालक धनाजी पाटील या देखील थोडक्यात बचावले.

घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उंडाळे–शेवाळवाडी मार्गावर घडली. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत आणि डॉक्टरांच्या पाहणीनंतर अधिराज पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिकांनी बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यामुळे अधिक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. मानव-बिबट संघर्ष वाढत चालल्याने ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही बिबट्यांचा वावर वाढला आहे. लोकांचा आरोप आहे की अधिवास सोडून बिबट्या गाव आणि शहरांमध्येही दिसत आहेत.याबाबत आता बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी जोर धरत आहे, तर वन्यजीवप्रेमी या उपाययोजनेच्या विरोधात आहेत.