हैदराबाद: हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदींवर आधारित निर्णयानंतर, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना देऊन समित्या गठीत करण्याचे आदेश दिले असून त्याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पत्र पाठवले
छत्रपती संभाजीनगर
जालना
धाराशीव
लातूर
हिंगोली
बीड
नांदेड
परभणी
या ८ जिल्ह्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत पत्र पाठवण्यात आले असून, त्यानुसार संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे.
गावपातळीवर गठीत समितीमध्ये कोण असणार
ग्राम महसूल अधिकारी
ग्रामपंचायत अधिकारी
सहायक कृषी अधिकारी
ही समिती प्रत्येक गावात चौकशी करून अहवाल तयार करेल.
अहवालाच्या आधारे मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-माराठा जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल.
समिती सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षण
समिती योग्य पद्धतीने काम करू शकेल म्हणून:
प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाईल
कार्यशाळा घेण्यात येईल
दस्तऐवज तपासणी, पडताळणी आणि चौकशी कशी करावी याची मार्गदर्शन पुस्तिका दिली जाईल
पुढील प्रक्रिया
1) संबंधित गावातील लोकांना अर्ज करावा लागेल.
2) हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींच्या आधारे त्यांची पडताळणी होईल.
3) समितीचा अहवाल सक्षम प्राधिकाऱ्यांकडे (जिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी) पाठवला जाईल.
4) योग्य पात्र ठरल्यास कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जाईल.
सरकारची भूमिका
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे काम तात्काळ सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.