त्या तरुण डॉक्टरने भुलीचे इंजेक्शन टोचून संपविले जीवन

महाराष्ट्र

बीड: एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भुल देण्याचे (शरूरकीयेवेळी बधीरीकरण करण्यासाठीचे) इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी (ता. २६) समोर आली. डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय २९), रा. जुजगव्हाण, ता. बीड असे या तरुण डॉक्टरचे नाव आहे.

शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर काय तो प्रकार समोर येईल, असे शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगीतले. तालुक्यातील जुजगव्हाण येथील मजूर कुटूंबातील डॉ. संजय ढवळे शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते.

तसेच, शहरातील एका दवाखान्यात निवासी डॉक्टर म्हणूनही कार्यरत होते. शनिवारी त्यांचा संपर्क होत नसल्याने मित्र व नातेवाईकांनी ते भाड्याने राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरातील खोलीचा दरवाजा ठोठावला.

मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आतमध्ये डॉ. संजय पवार यांचा मृतदेह त्यांच्या खाटेवर आढळून आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन जुजगव्हाण येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ व एक अविवाहित बहिण आहेत.

भुल देण्याचे इंजेक्शन टोचले

मृतदेहाशेजारी भुल देण्याचे इंजेक्शन (शस्त्रक्रीयेवेळी बधीरीकरण करण्याचे) निओव्हेक १० नावाचे इंजेक्शन आढळले आहे. या इंजेक्शनमध्ये व्हेक्युरोनिअम ब्रोमाईड घटक असून याचा उपयोग केवळ शस्त्रक्रीयागृहात किंवा अतिदक्षता विभागात केला जातो, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पारखे यांनी सांगीतले.

शस्त्रक्रियेदरम्यान पेशी हालू न देण्यासाठी, गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना त्यांच्या हालचाली नियंत्रित ठेवण्यासाठी हे इंजेक्शन वापरले जाते. त्याचा श्वसन यंत्रणेवर थेट परिणाम होतो. म्हणूनच त्यासोबत व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणा आवश्यक असते. रुग्णालयाबाहेर किंवा वैद्यकीय देखरेखीशिवाय वापरल्यास यामुळे काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश

जिल्हा रुग्णालयात डॉ. संजय ढवळे यांचा मृतदेह आणल्यानंतर त्यांची आई, बहिण, वडिल यांचा भाऊ यांचा मन हेलावणारा आक्रोश होता.