स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असत भाऊ…

महाराष्ट्र

मुंबई: स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असतं भाऊ? या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी “मुंबई  मराठी  ग्रंसंग्रहालया”च्या “सुरेंद्र  गावसकर सभागृहा”त  करण्यात आले होते. मा .राज्य महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, विद्याताई चव्हाण, मा. अध्यक्ष माविम, ज्योती  ठाकरे, मा. वृषाली मगदूम, मा. संस्थापक, जिजाऊ वुमन लीगल फोरम, ऍड. शुभांगी सारंग यांनी आपली परखड मते मांडली.  सुसंवादक म्हणून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष व महिला समिती निमंत्रक, पत्रकार शीतल करदेकर यांनी वर्तमानातील महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करून चर्चेला सुरुवात केली.

“स्त्री सन्मान करणे, होणे हे आधुनिकीकरण नव्हे तर ते प्रगतशील समाजाचे लक्षण, ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्त्रीला माणूस म्हणून स्वतः चे आत्मभान व आत्मसन्मान राखत पुरुषाच्या बरोबरीने शिक्षण, सत्ता आणि संपत्तीत समान पातळीवर भागीदार होता आले पाहिजे. केवळ लिंगबदल आहे म्हणून तिच्याविषयी हीन भावना किंवा आकर्षणातून निर्माण झालेली ओढीची झापडं काढून तिचा व तिच्या स्त्रीत्वाचा सर्वत्र योग्य तो मान, सन्मान व आब राखला गेला पाहिजे. आज ज्या पध्दतीने स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाजात लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्काराचे प्रमाण वाढत आहे ते पाहता घरातल्या संस्काराबरोबरच समाज संस्कारांची बांधणी होणे गरजेचे आहे. यासोबतच “मला काय त्याचे?” असं म्हणणारी टोकाची बेफिकीरी आणि औदासीन्य झटकून संवेदनशीलतेचे सकारात्मक समाजमन घडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक हातभार लावला पाहिजे व चूक ते चूकच, असे ठाम मत ज्योती  ठाकरे यांनी व्यक्त केले.

“कुस्तीगीर‌ महिलांना न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला ताबडतोब अटक झाली पाहिजे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी ही‌ लढाई चालू ठेवली पाहिजे. लव्ह जिहाद विषयावरून  समाजात दोन गटात तेढ निर्माण केली जाते आहे,ध्रुवीकरण होत‌ आहे,एका गटाला टार्गेट करून संविधानमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. आजही आपल्या देशात मुलगा व मुलीत, भेद केला जातो, मुलीच्या गळतीचे प्रमाण चिंताजनक आहे. मुलगी ही जबाबदारी,ओझं वाटते, संविधानने स्त्री पुरुष समानता सांगितली आहे. आज महिलांना हिंसामुक्त, निरोगी व निकोप पर्यावरणात जगण्याचा अधिकार व हक्क आहे. जाणीव जागृती कार्यक्रम घेऊन समाजात समतेचा, स्त्री सन्मानाचा विचार रुजवला पाहिजे असे वाटते. मुलींनाही मुलांइतके व मुलांसारखे शिक्षण मिळाले पाहिजे”, असे विचार सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका वृषाली मगदूम यांनी व्यक्त केले.

“आपल्या महिला सक्षम आहेत पण त्यांना कायद्याची माहिती नाही. एफआरआय म्हणजे काय असतं ते माहिती नाही. आपले संविधान खूप महत्त्वाचे आहे. पोलिसांना स्वातंत्र्य दिलं तर ते खूप काही करू शकतात. महिला अत्याचाराच्या केसेसमध्ये राजकीय दबाव असतात. महिलांवर अत्याचार होतो तेव्हा पीडितेचा एफ आय आर अचूक नोंदवला जात नाही. महिलेला अनेक प्रश्न विचारले जातात, पोक्सो  कायद्यात मेडिकल रिपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. अन्याय होऊ नये म्हणून आपल्याबद्दलच्या कायद्याची माहिती असायला हवी, ती आपल्याला मोबाईलवर उपलब्ध होऊ शकते हेही महिलांना माहिती नसते यासाठी जागृतीची, सजगतेची गरज आहे, असे विचार ऍड. शुभांगी सारंग  यांनी व्यक्त केले. तर मा. आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की, “हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. बृजभूषण शरण सिंह हा बाहुबली नेता काहीही करू शकतो. कुस्तीगीर महिला खेळाडूंबाबत घडलेली ही अत्यंत निंदनीय घटना आहे.

गृहमंत्रालय ज्यांच्याकडे आहे ते हे खातं सांभाळू शकत नाहीत हे सिध्द झालंय! २०१६ ला  सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमच्यावर दबाव आहे असे सांगितले होते!  लोहिया नावाच्या जजची  हत्या झाली, गुन्हेगारांना सोडण्याचे काम झाले आणि होते आहे. ‘मोदीहहै तो मुमकीन है!’ हे असं मुमकीन? उन्नाव, हातरस, कठुवा कांड किती भयंकर अत्याचार घडले? हातरसमध्ये तर त्या मुलीला रात्रीच्या रात्री जाळून टाकण्यात आल. देशाचे गृहमंत्री जर स्वतः एक गुन्हेगार असेल तो ते जनतेला काय न्याय देणार? या कुस्तीगीर महिलांनी तक्रार केली, त्यातील पोक्सो चार्ज काढून टाकण्यात आला आहे, का?

आपण अनेक जण घाबरतो हिंदू मुस्लीम लवजिहाद यावर हे सगळे राजकारण सुरू आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या धानाला भाव आणि बेरोजगारी हे तीन खरे विषय आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे या विषयाकडे सर्वांचे दुर्लक्ष व्हावे म्हणून आपण या सगळ्याला बळी न पडता मुख्य तीन चार प्रश्नांवरच बोलायला हवे,” असेही  आवाहन विद्या चव्हाण  यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी  मान्यवर वक्त्याचे ग्रंथभेट देऊन प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे व कार्यवाह उमा नाबर यांनी स्वागत केले. गावडे यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रगतिशील उपक्रमांची माहिती देऊन आभार मानले. या कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य हेमंत जोशी तसेच ऍड. सुनील गायकवाड व ऍड. राजेश डुंबरे, कर्मचारी वर्ग तसेच महिला व महाविद्यालय विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.