जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळींबाच्या शेतीतून काढले 20 लाखांचे उत्पन्न…

महाराष्ट्र

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील कृष्णा चावरे या शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंब बाग फुलवून दाखवली आहे. विशेष म्हणजे फक्त बाग फुललीच नाही तर त्यातून लाखोंचा उत्पन्न देखील मिळवले आहे.

आपल्या पारंपारिक पद्धतीच्या शेतीला फाटा देऊन काही तरी नवीन प्रयोग करण्याचं कृष्णा चावरे यांनी ठरवलं होते. चावरे यांची कोळीबोडखा शिवारात वडिलोपार्जित जमीन असून, त्यांनी सात एकर क्षेत्रावर डाळिंब बाग लावली आहे. तर उर्वरित क्षेत्रात तूर लागवड केली आहे.

स्वतः कृषी सेवा केंद्र चालत असताना त्यांनी आपल्या सात एकर शेतात डाळीबांची बाग लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2020 मध्ये शेतीविषयी नियोजन करून त्यांनी डाळिंबाची 2000 झाडं लावली. कृष्णा चावरे यांच्या डाळिंब बागेच्या एका कॅरेटला 3100 ते 2100 रुपयांचा भाव मिळाल्याने त्यांनी डाळिंब बागेसाठी केलेली मेहनत फळाला आली असून चावरे यांनी डाळिंब बागेतून पहिल्या वर्षीच अडीच लाख खर्च तर पंचवीस लाखांचे उत्पन्न घेतले आहे.