छत्रपती संभाजीनगरातील मंदिरात ड्रेसकोड लागू होणार?

महाराष्ट्र

संभाजीनगर: मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारचे कपडे न घालता, मंदिरांमध्ये प्रवेश करताना पेहराव योग्य असावा, अशी मागणी समोर येत आहे. काही दिवसांपासून मंदिरात प्रवेश करताना आपल्या संस्कृतीला शोभेल असा पेहराव परिधान करावा, अशी नियमावली देशभरातील वेगवेगळ्या मंदिरात लागू करण्यात येत असल्याचे दिसून येत असून राज्यातील अनेक ठिकाणी अशीच काही नियमावली लागू करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मंदिरात देखील अशी नियमावली लागू होण्याची शक्यता असून माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने शहरातील 20 मंदिरात पेहरावाबाबत फलक लावण्यात आले आहे. मंदिरात दर्शनासाठी येताना भारतीय परंपरेला साजेसे शोभेल असेच पारंपारिक वस्त्र परिधान करून महिलांनी आणि पुरुषांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी यावं, अश्लीलता वाढवणारे, बीभत्स, उत्तेजक वस्त्र परिधान करू नयेत, असं या फलकामध्ये सांगितले आहे.

शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक लावल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरातील संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून तरुणांनी हाफ पँट घालून मंदिरात येऊ नये, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. तसेच फॅशनच्या नावाखाली तरुणींनी गुडघ्यापर्यंत स्कर्ट तसेच लोअर घालून मंदिरात येऊ नयेत. विविध प्रकारचे कपडे परिधान करणे हा वैयक्तिक मुद्दा असला तरीही मंदिर ही श्रद्धेची जागा असल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.