शिक्रापुर पोलिस स्टेशनचे API केशव वाबळे यांनी महाराष्ट्राला मिळवून दिले सुवर्णपदक

महाराष्ट्र मुख्य बातम्या

शिक्रापुर (तेजस फडके) शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नॅशनल मास्टर्स गेम्स २०२४’ या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत महाराष्ट्राला धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक तसेच रौप्यपदक मिळवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली असुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

केशव वाबळे हे सन 2010 साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रुजू झाले. त्यांनी प्रथम सोलापूर ग्रामीण आणि त्यानंतर ‘सहायक पोलिस निरीक्षक’ पदी पदोन्नती घेत त्यांनी गोंदिया जिल्ह्यामधील संवेदनशील नक्षलग्रस्त भागामध्ये काम केले. पुणे ग्रामीण मधील लोणीकंद पोलीस स्टेशन, यवत पोलीस स्टेशन येथे सेवा बजावून तीन महिन्यापूर्वी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले आहेत. केशव वाबळे हे राष्ट्रीय स्तरावरील धावपट्टू असून पोलीस दलामध्ये काम करताना अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करुन अनेक सराईत आरोपींना जेरबंद केले आहे.

केशव वाबळे यांनी नक्षलग्रस्त भागामध्ये खडतर सेवा बजावल्यामुळे त्यांना यापूर्वी केंद्र शासनामार्फत खडतर सेवा पदक व राज्यशासनामार्फत आंतरिक सुरक्षा पदक प्रदान करण्यात आलेले आहे. वाबळे यांची सध्या शिक्रापूर येथे सहायक पोलिस निरीक्षक म्हणुन नियुक्ती झाली असुन त्यांनी पोलिस दलातच नव्हे तर खेळाच्या मैदानातही चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.

 

दि ८ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान गोवा येथे नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अथलेटिक्स फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल स्विमिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, योगा या खेळांचा सहभाग होता. महाराष्ट्रातर्फे एकूण ५०७ खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग घेतला होता. केशव वाबळे हे महाराष्ट्र टीमचे कॅप्टन होते. या स्पर्धेमध्ये त्यांनी ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल तर ४ × १०० मीटर रिले रनिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवत महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली आहे.

शिरुर तालुक्यात बंदूकिचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन जीवघेणा हल्ला…