उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ना नाम बचा, ना निशान…!

राजकीय

औरंगाबाद: निवडणूक आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. त्याना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे.

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरुन शिंदे – ठाकरे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे

या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या चिन्हांच्या यादीतून दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे निवडण्यास सांगण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. हा अंतरिम आदेश लागू होईपर्यंत उद्धव ठाकरे- शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाला 10 ऑक्टोबरपर्यंत नवीन निवडणूक चिन्ह तसेच पक्षाच्या नावाची माहिती द्यावी लागणार आहे.

दोन्ही गटांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळी नावे तसेच चिन्हे वाटप करणार असून, निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयापर्यंत हे काम सुरु राहणार आहे. आगामी पोटनिवडणुकीत दोन्ही गट एकाच पक्षाचे नाव, चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत.