‘रांजणगाव’ मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा

मुख्य बातम्या राजकीय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत तीन विरोधकांनी एकत्र येत ग्रामपंचायतवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. रांजणगावातील प्रस्थापित पुढऱ्यांच्या विरोधात तरुणाईने दंड थोपटले आणि विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे रांजणगाव मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा सुरु आहे.

रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तीन पारंपरिक विरोधकांनी एकत्र येत सत्तेसाठी मोट बांधली होती. त्यामुळे त्याची भल्याभल्यांनी धास्ती घेतली. परंतु विरोधकांनीही एकत्र येत सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. त्यात विरोधी पॅनलचे राहुल पवार, अर्चना शिंदे हे विजयी झाले. तर एक अपक्ष उमेदवार निवडुन आला. त्यानंतर रांजणगाव मध्ये पुणे-नगर रस्त्यावर दोन वेगवेगळे बॅनर लावण्यात आले. त्या बॅनरच्या मजकूरामुळे रांजणगाव मध्ये सगळीकडे सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा रंगली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सगळीकडे बॅनरच्या मजकुराचीच चर्चा…

रांजणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर पुणे-नगर रस्त्याच्या कडेला दोन वेगवेगळे बॅनर लावण्यात आले. त्यात एका बॅनरवर शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा युवासेनेचे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे आणि त्यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्चना शिंदे यांचा फोटो टाकत “आख्खा गाव नडला, पण वाघ नाय पडला” असा मजकुर छापण्यात आला. तर दुसऱ्या बॅनर वर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे बापुसाहेब शिंदे यांचा फोटो टाकत “ज्यांच्यासाठी युती केली, तेच नाही पडले” असा मजकुर छापण्यात आला असल्याने सगळ्या गावात याची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

‘तो’ नेता नडला पण फरक नाय पडला…

रांजणगाव गणपतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत  सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांचा कट्टर समर्थक असलेल्या गावातील एका राजकीय नेत्याने प्रशासनावर दबाव टाकुन राहुल पवार यांना अडचणीत आणण्यासाठी तडीपार करण्याचा प्रयत्न केला. परंतु बापुसाहेब शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधत खरी वस्तुस्थिती समोर आणल्याने राहुल पवार यांना दिलासा मिळाला. या सगळ्या राजकीय घडामोडींचा परिणाम थेट मतदानावर झाल्याने राहुल पवार आणि बापुसाहेब शिंदे यांच्या पत्नी अर्चना शिंदे यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिल्याने ‘तो’ राजकीय नेता तोंडावर पडल्याची सगळीकडे चर्चा चालु आहे. त्यामुळेच “ज्यांच्यासाठी युती केली, तेच नाही पडले” अशा आशयाचा बॅनर रांजणगाव मध्ये झळकत आहे.