पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत राजकीय स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला भाजपने धक्का दिल्याचे चित्र आहे. कसब्यातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
वैष्णवी किराड यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कसब्यातील शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने काही ठिकाणी युती केली होती, तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरले होते. ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये युती झाली नाही, तिथे अनेक इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे शिंदे गटाकडून भाजपविरोधात नाराजीही व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, कसब्यातील पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणी आले, न आले तरी धंगेकर एकटा बास आहे. एकटा धंगेकर सगळ्यांना बास आहे. मला कोणाची मदत लागत नाही. मी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या जागी ठेवतो. त्यांचं भविष्य आहे, त्यांना काम करायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल, मी माझ्या राजकारणात कोणाला बरोबर घेत नाही. इथे एकटा धंगेकर बास आहे,” असे धंगेकर म्हणाले.धंगेकर यांच्या या आक्रमक प्रतिक्रियेमुळे कसब्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चेला आणखी उधाण आले आहे.