शिंदेच्या बसेसवर ‘त्या’ दोघांना सोडून सर्वांना स्थान, राजकीय तूट सुसाट..

राजकीय

कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज डोंबिवलीमध्ये येणार आहे. त्यांच्या विशेष उपस्थितीत कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगलीसाठी रवाना होणार आहेत. यानिमित्ताने आज पुन्हा एकदा शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. बसेसवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. त्यामुळे नवीन युतीच्या बसेसची चर्चा रंगली आहे.

काही महिन्यांपूर्वी मातोश्रीला टाटा बाय बाय करत एकनाथ शिंदे यांनी मुंबई, सुरत, गुवाहाटी ते गोवा असा प्रवास केला. हा प्रवास करता करता ते मुख्यमंत्री झाले. मात्र शिंदेनी तो टाटा बाय केला, तो कायमचाच असे आतापर्यंत तरी म्हणायला हरकत नाही. कारण आता पुन्हा शिंदेंची स्वारी बसने निघाली आहे, ती कोकणात. आता ती कशी काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ते स्पष्ट होईलच. पण या स्वारीत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना स्थान देण्यात आले आहे. इतकेच काय तर नवीन फ्रेंडशिप झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो लागले आहेत.

एका बाजूला ही सर्व मंडळी आणि दुसऱ्या बाजूला शिंदे पिता पुत्र यांचे फोटो आहेत. मात्र सेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो नसल्याने शिंदेनी नवीन राजकीय समीकरणासाठी मुंबई सोडली आणि ठाकरे. नो नेव्हर असा पवित्रा घेतला तो आजही कायम आहे. राजकीय समीकरण बदलली आणि आगळ्यावेगळ्या मैत्रीची गुंफण असलेल्या बसेस आज सर्वत्र नजरेस पडत आहेत.

आज मुख्यमंत्री शिदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे डोंबिवलीमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या विशेष उपस्थितीत ST महामंडळाच्या ३५० बस डोंबिवलीचे संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुल मधून आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असणार आहेत. या सर्व गाड्यांचे मोफत आयोजन शिंदे यांनी केले असून त्यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यावरच बसेस रवाना होणार आहेत.

या बसेसवर असणारे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. नवरात्र असो की गणेशोत्सव प्रत्येक सणात राजकीय पक्षांमध्ये नेहमीच चुरस पहायला मिळते. त्यात कल्याण डोंबिवली ही शहर राजकीयदृष्ट्या हॉट डेस्टिनेशन झाली आहेत. ठाणेकर मुख्यमंत्री झाले आणि कल्याण डोंबिवलीची देखील राजकीय समीकरणे बदलली. पण, राजकीय समीकरण काहीही असो 2 वर्षांनी निर्बंधमुक्त सण साजरे होत असून गावी जायला मिळत असल्याने चाकरमानी मात्र प्रचंड खुश आहेत.