Win

शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय…

राजकीय शिरूर तालुका

सविंदणे: शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या रविवार (दि. २६) रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनल ने ११-७ असा दणदणीत विजय मिळवत सत्ता अबाधित राखली आहे.

शिरुर तालुक्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांची निवडणूक असल्याने सगळ्याच पक्षांचे नेते आणि राजकीय मंडळी यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. बुद्धिजीवी वर्ग म्हणून या गटाकडे पाहिले जाते. सर्वच्या सर्व सुशिक्षित आणि जाणकार मतदार असल्याने निवडणुकीच्या काळात येथे अनेक हालचाली घडल्या असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली घडल्याची चर्चा शिक्षकांच्या संपर्कातील जाणकारांमधून होत आहे. एकूण १४६९ पैकी १४५८ मतदारांनी सहभाग नोंदविला.

३०० कोटींच्या पुढे उलाढाल असलेल्या संस्थेची १२ वर्षे सत्तेची चावी स्वतःकडे ठेवणाऱ्या सहकार पॅनल ने महागणपती पॅनल च्या परिवर्तनाच्या मनसुब्यावर पाणी फिरवत तिसऱ्यांदा सत्ता खेचून घेतली आहे. विजयी उमेदवार सहकार पॅनल नंदकुमार पडवळ, विजय गोडसे, मानसी थोरात, अनिल शेळके, संदीप थोरात, रामचंद्र नवले, चंद्रकांत खैरे, म्हतारबा बारहाते, संतोष विधाटे, अंजली शिंदे, शर्मिला निचीत महागणपती पॅनल अविनाश चव्हाण, विश्वास साकोरे, प्रभाकर शेळके, संतोष थोपटे, बबन म्हाळसकर, कैलास गारगोटे, शरद झेंडे अशी विजयी झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.

तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवून आपल्या पक्षाचा किंवा विचाराचा उमेदवार निवडीसाठी कंबर कसली होती. अशी प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होत आहे.