शिरुर तालुक्यातील मेंढपाळाच्या पिशवीतून दागिने व रोख रकमेसह 1 लाख 80 हजारांची चोरी…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावच्या हद्दीत खंडागळे वस्ती येथे आपल्या बायको व आईसहीत मेंढपाळ बाळू कोकरे हे नामदेव खंडागळे यांच्या शेतात मेंढ्या घेऊन मुक्कामी असताना त्यांची आई व पत्नी यांनी एका पिशवीत ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजारांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत बाळू मारुती कोकरे (वय 45) रा. न्हावरा, ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, न्हावरे येथील बाळू कोकरे हे मेंढपाळ असून (दि 19) रोजी ते मेंढ्या घेऊन नामदेव आनंदराव खंडागळे यांच्या शेतात मुक्कामी थांबले होते. रात्री 11 च्या दरम्यान सर्वजण झोपी गेले. सकाळी 6 च्या सुमारास कोकरे यांना जाग आली असता लेपाट्यात ठेवलेल्या पिशवी मधुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे धाव घेत दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार चव्हाण करत आहेत.