भोगवटा प्रमाणपत्र न घेता बेकायदेशीरपणे शिरुर बसस्थानक व दुकान गाळ्यांचा वापर सुरु

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानक व दुकान गाळयांचा वापर भोगवटा प्रमाणपत्र न घेता सुरू असल्याची लेखी तक्रार महिबुब जैनुद्दीन सय्यद, (उपाध्यक्ष म.न.से ,पुणे जिल्हा) यांनी सहआयुक्त नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडे काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानंतर सहआयुक्तांनी सदर प्रकरणी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याबाबतचे आदेश शिरूर नगर परिषदेला दिले होते.

शिरूर नगर परिषदेने शिरूर आगारप्रमुख यांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेईपर्यंत सदर दुकान गाळ्यांचा वापर स्थगित करावा. अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अन्वये नियमोचित कार्यवाही केली जाईल, असे लेखी पत्र (दि. १६) फेब्रुवारी रोजी दिले आहे.

आता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता विनापरवाना बसस्थानक व तेथील गाळ्यांचा वापर प्रमाणपत्र देईपर्यंत खरोखर स्थगित होतोय का? स्थगित न झाल्यास शिरुर नगरपरीषद काय कारवाई करते याकडे शिरुर शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.