पशु पक्षांच्या रक्षणासाठी झटणारा अवलिया शेरखान शेख

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): प्रत्येक नागरिकाला कोणता ना कोणता छंद असून त्या माध्यमातून प्रत्येक नागरिक आपला छंद जोपासत असतो परंतु काही नागरिक हे मुक्या प्राण्यांच्या रक्षणासाठी पुढाकार घेत असतात त्या प्रमाणे शिरुर तालुक्यातील शेरखान शेख यांनी पशु पक्षांसाठी अनोखे कार्य करुन पशु पक्षांसाठी झटणारा अवलिया अशी ओळख निर्माण केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेरखान शेख यांनी अनेक पशु पक्षांच्या रक्षणाचे कार्य सुरु करुन शेकडो विषारी बिनविषारी सापांसह जखमी मोर, पोपट, कासव, बगळा, कोल्हा, घार, घुबड, घोरपड, सरडे, साळींदर यांच्या सह शेतांमध्ये आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यांना देखील वनविभागांच्या मदतीने जीवदान देत त्या बछड्यांना त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्याचे काम केले आहे. या कामासोबत यापूर्वी सापांच्या अंड्यांमधून कुत्रिम मदतीने सापाच्या पिलांना जन्म दिला.

उन्हाळ्या मध्ये पशु पक्षांच्या अन्न पाण्याची देखील व्यवस्था करण्यात पुढाकार घेतला आहे. तसेच कत्तलीसाठी जाणाऱ्या गाई बैलांची देखील त्यांनी सुटका करत कत्तली साठी जाणारी जनावरे गोशाळेत जमा केली आहेत. इतकेच नव्हते तर सापांची हत्या करणाऱ्या तसेच सापांबाबत अंधश्रद्धा पसरविणाऱ्या लोकांवर देखील गुन्हे दाखल केले आहे.

साप पकडण्याच्या छंदातून आपण काहीतरी वेगळे करण्याचा संकल्प करत स्वतः साप पकडण्यासाठी अर्धा किलो वजनाची चांदीची स्टिक बनवून महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे साप पकडण्यासाठी चांदीची काठी बनवणारा प्रथम सर्पमित्र म्हणून त्यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉड व राष्ट्रीय पातळीवरील ओएमजी बुक रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

शेरखान शेख यांच्या पशु पक्षांसाठी सुरु असलेल्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांची पशु पक्षांसाठी झटणारा अवलिया म्हणून ओळख निर्माण झाली आहे.