शिरुर (अरुणकुमार मोटे): दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या खडकवासला पाटबंधारे विभागाअंतर्गत भीमा नदीवरील तसेच कुकडी प्रकल्पातील डिंभे पाटबंधारे विभागाअंतर्गत उजव्या कॅनाल व घोडनदीवरील शेतकऱ्यांकडून दरवर्षी पाणी वापरापोटी या विभागाकडून पाणीपट्टी वसूल केली जाते.
सदरची पाणीपट्टी वसूल केली जात असताना शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यानंतर पाटबंधारे कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे भरल्याची पावती दिली जात नाही. शेतकऱ्यांनी सबंधित कर्मचाऱ्याकडे पावतीची मागणी केल्यास उद्या देऊ, परवा देऊ असे ढकलत पावती देण्यास टाळाटाळ केली जाते.
नंतरच्या काळात शेतकरी आपल्या कामाच्या गडबडीत पावती घ्यायची विसरुन जातो. याचा गैरफायदा घेऊन हे कर्मचारी ती पाणीपट्टीची रक्कम स्वतःच्या खिशात घालतात व यामुळे शेतकरी आपोआपच थकबाकीत जातो. अशा प्रकारच्या तक्रारी शिरुर तालुक्यातून प्राप्त होत आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी पारदर्शक पद्धतीने पाणीपट्टी भरणा सिस्टम राबवता येईल का हे पाहावे अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.