शिरुर नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेचे संरक्षण कंपाऊंड वॉल तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषद हद्दीतील स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथे उभारलेल्या सिमेंटच्या कंपाऊंड वॉलची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (दि. २२) मार्च २०२५ रोजी मध्यरात्री घडला असून, याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, कचरा डेपो येथील कचऱ्याला आग लावण्यात आल्याचीही घटना घडली असून, यामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरातील रहिवाश्यांना आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागला आहे. या घटनेबाबतही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिरुर नगरपरिषद हद्दीतील काही महत्त्वाच्या शासकीय जागांचे संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी सिमेंटच्या कंपाऊंड वॉल उभारण्यात आल्या आहेत. या संरक्षित जागांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र (STP),पाबळ फाटा जवळील जागा, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केटयार्ड) समोर,स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो), सोनार आळी येथील हनुमान मंदिर समोर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि व्यवसायिकांना नगरपरिषदेच्या वतीने कळविण्यात येते की, नगरपरिषदेकडून संरक्षित जागांवरील कंपाऊंड वॉल तोडल्यास, अनधिकृतपणे रंगरंगोटी अथवा जाहिरातबाजी केल्यास, संबंधित व्यक्तींवर मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा न्यायसंहितेच्या अधिनियमांनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, शहराच्या स्वच्छतेसाठी आणि शासकीय मालमत्तेच्या संरक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिरुर नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.