शिरुर तालुक्यात सोळा वर्षीय युवतीचा बालविवाह

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका एकवीस वर्षीय युवकाचा चक्क सोळा वर्षीय विद्यालयीन युवतीशी विवाह झाल्याची घटना घडली असून याबाबत एका नागरिकाने पोलीस अधीक्षक कार्यालयासह स्थानिक पोलिसांकडे तक्रार देत बालविवाह व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी एका नागरिकाने केली आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बड्या उद्योजकाच्या 21 वर्षीय मुलाचा चक्क तळेगाव ढमढेरे येथील विद्यालयात दहावीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीशी विवाह करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर विवाह हा मुला मुलींच्या आई वडिलांच्या संमंतीने करण्यात आलेला असून याबाबत एका नागरिकाने युवक व युवतीसह नवरदेव मुलाचे आई वडील व भावासह नवरदेव मुलीच्या वडिलांच्या नावे पोलीस अधिक्षक कार्यालय सह शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे.

सदर युवती शाळेत असताना तिच्या वडिलांनी खोटे कारण सांगून तिला घरी नेले असल्याचे तक्रार दाराने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. मात्र अल्पवयीन युवतीचा बड्या मंगल कार्यालय मध्ये थाटामाटात विवाह केलेला असून तातडीने विवाह करण्यामागील कारण अद्यापही कोणाला समजू शकले नाही, तर सदर युवतीशी विवाह करणारा युवक हा एका सणसवाडी येथील बड्या उद्योजकासह राजकीय व्यक्तीचा मुलगा असल्याने यावर पोलीस अधिकारी कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे.

विवाह झालेला असून चौकशी सुरु; हेमंत शेडगे

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सणसवाडी येथे 16 वर्षीय युवतीचा विवाह झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली असून त्याबाबत चौकशी करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.