शून्य अपघात चा निर्धार; शिरूर शहरात महावितरणतर्फे विद्युत सुरक्षा जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने महावितरण शिरूर उपविभागातर्फे “शून्य अपघात हेच आमचं ध्येय” या मंत्राला आत्मसात करत, शिरूर शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा मोलाचा प्रयत्न करण्यात आला.

रॅलीदरम्यान शहराच्या मुख्य मार्गांवरून मोटरसायकल्सच्या मिरवणुकीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. विद्युत सुरक्षेच्या सूचना दर्शवणारे फलक, बॅनर आणि घोषवाक्ये लावून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.सुरक्षित वीज वापराचे महत्व, ऊर्जेची बचत, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार, तसेच अनधिकृत वीज वापर आणि असुरक्षित जोडण्यांपासून होणारे धोके याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.

सुमित जाधव, उपकार्यकारी अभियंता (महावितरण, शिरूर उपविभाग) यांनी सांगितले की,”विद्युत सुरक्षा ही केवळ महावितरणची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. शून्य अपघाताचे उद्दिष्ट हे फक्त घोषणा नसून आमचा सातत्याने चालणारा प्रयत्न आहे.”

यावेळी महावितरणच्या शिरूर उपविभागातील सर्व अधिकारी, तांत्रिक कर्मचारी, ठेकेदार कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्युत ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रॅलीदरम्यान शहरवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवत महावितरणच्या या उपक्रमाचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून फलकांवरील संदेश वाचत आपली जाणीव व्यक्त केली.महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून ग्राहकांना सुरक्षित, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण वीज सेवा देण्याचे संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केले. तांत्रिक बिघाडांवर तातडीने उपाययोजना, ग्राहकांच्या समस्या तत्काळ सोडवणे आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शून्य अपघाताचा निर्धार,ऊर्जा संवर्धनाचा संदेश,पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार,ग्राहक-केंद्रित सेवा व प्रतिबद्धतया विशेष उल्लेखनीय बाबी त्यांच्या अभियानातून दिसून आल्या.