शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील तिर्थक्षेत्र दत्त देवस्थान असलेल्या गुनाट गावच्या सरपंचपदी प्रदीप कंद यांचे खंदे समर्थक रामदास दगडु काकडे यांची नुकतीच निवड झाली. सरपंच सुनंदा शिवाजी कोळपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवार (दि ५) रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
गुनाट ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी रामदास दगडु काकडे आणि संध्या सुभाष भैरट यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते. यावेळी गुप्त मतदानातुन रामदास दगडु काकडे विजयी झाले. निवडणुक निर्णय अधिकारी नंदकुमार खरात, तलाठी आलिशा महाकाल यांनी तर सचिव म्हणून ग्रामसेवक करपे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेले तीन वर्षे गुनाट गावात सरपंचपदाची निवडणुक बिनविरोध पार पडत होती. मात्र यावर्षी दोन उमेदवार सरपंचपदासाठी इच्छुक असल्याने निवडणूक घेण्यात आली. यावेळी गुप्त पद्धतीने मतदान झाले. यावेळी नऊ पैकी सहा मते सत्ताधारी गटातील रामदास काकडे यांना तर तीन मते विरोधी गटातील संध्या बहिरट यांना मिळाली. सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
रामदास काकडे हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांचे खंदे समर्थक असल्यामुळे ही निवडणुक चुरशीची झाली. यामध्ये रामदास दगडु काकडे यांना बहुमत मिळाल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली. या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी भाजपाचे शिरुर तालुका उपाध्यक्ष तसेच गावचे माजी सरपंच पांडूरंग कोळपे, संदेश करपे, सुनंदा शिवाजी कोळपे, उपसरपंच छकुली धुमाळ, माजी उपसरपंच रोहिणी गव्हाणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बापू झिटे,विकासोचे माजी अध्यक्ष संभाजी गाडे, माऊली भगत, अनिल भालेराव, भिवसेन कोळपे, संतोष गव्हाणे, पांडूरंग गव्हाणे, गोरख धुमाळ, सचिन फडके, प्रदिप निघुल, आप्पासाहेब कोळपे, भाऊ फंड,गणेश डोंगरे, दादा धुमाळ,दादा कारंडे,बापू पारखे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेले तीन वर्षे विरोधकांनी ग्रामपंचायतचच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध केली. परंतु गावातील अल्पसंख्यांक कुटुंबातील व्यक्तीला सरपंचपद देण्याची वेळ आल्यावर मात्र विरोधकांनी त्याला कडाडुन विरोध केला. त्यामुळे हि निवडणुक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत आम्ही विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
पांडुरंग कोळपे
माजी सरपंच, गुनाट
ज्यांनी माझ्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना ग्रामस्थांनी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य तसेच विकासोच्या सोसायटी संचालक केले आहे.शिवाय शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा त्यांचाच ठराव गावाने बिनविरोध दिला होता. एवढी सगळी पदे बिनविरोध दिलेली असतानाही त्यांना सरपंचपदाचा मोह सुटला नाही. ‘सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही’ या वाक्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मला साथ दिली.
रामदास काकडे
सरपंच, गुनाट