दळणवळण ठप्प, नागरिकांमध्ये तीव्र संताप
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई-येथिल फत्तेश्वर बंधाऱ्यावरील पूल तसेच बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोहजवळील पूल जोरदार पावसामुळे धोकादायक स्थितीत गेले आहेत. फत्तेश्वर पुलाच्या बंधाऱ्याचा मोठा भाग प्रचंड पुराच्या पाण्याने उघडला गेला असून वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे.
त्याचप्रमाणे बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोह पुलाची अवस्था देखील अत्यंत दयनीय झाली असून हा पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक यांना मोठा फटका बसत असून रोजच्या प्रवासासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे.
दरम्यान, या दोन्ही ठिकाणच्या नवीन पुलांचे काम काही दिवसांपासून ठप्प झाले आहे. ठेकेदारांकडून काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “पूल बंद झाल्यामुळे आमच्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम होत आहे. ठेकेदारांनी तातडीने काम सुरू करावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.