“ताशा सम्राट” याकुबभाई मणियार यांचा “मराठी राज गौरव” पुरस्काराने सन्मान

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून “शिरुर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या” वतीने आयोजित केलेल्या मराठी लोक कलावंतांच्या सन्मान सोहळ्यात शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात ताशा सम्राट म्हणुन प्रसिद्ध असलेले निर्वी (ता. शिरुर) गावातील याकुबभाई मणियार यांचा “मराठी राज गौरव” पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निर्वी हे याकूबभाई मणियार यांचे गाव असुन याकूबभाई हे जुन्या पिढीतील कलावंत असून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या मनामध्ये घर केले आहे. त्यांनी ताशा वाजविण्याची कला त्यांचे मोठे बंधु करीमभाई मणियार यांच्याकडून आत्मसात केली आहे. करीमभाई हे एक नामवंत कलाकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून याकुबभाई यांनी कलेच्या माध्यमातून आपली वेगळीच ओळख निर्माण केली असुन आजही त्यांच्या ताशाला खूप मागणी असते.

जुन्या काळामध्ये पारंपारिक वाद्यांना खूप महत्त्व असायचे जुन्या काळातील ताशा हे वाद्य क्वचितच कलाकारांकडे पाहावयास मिळते. त्यापैकी याकुबभाई हे एक उदाहरण असुन गेल्या 40 ते 50 वर्षांपासून ताशा आणि ढोल वाद्याची कला त्यांनी जपली आहे. त्यांच्या वाद्याला खूप प्रमाणात मागणी असते. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वाद्याच्या माध्यमातून ते आपली कला सादर करतात आणि प्रेक्षक सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने दाद देतात. कुठलाही धार्मिक कार्यक्रम किंवा लग्नसराई असो याकूबभाई यांचा ग्रुप त्या कार्यक्रमाला असतो “बालेशा सनई ताफा” या ग्रुपच्या माध्यमातून ती आपली कला सादर करतात. या ग्रुपमध्ये नामावंत कलाकार आहेत.

त्यांचा ग्रुप पुणे जिल्ह्यासह इतर ठिकाणी आपली कला सादर करतात त्यांच्या ताफ्याला खुप मागणी असते. त्यांच्या सनई ताफ्याला संपूर्ण महाराष्ट्रात मागणी असते. तसेच DJ च्या कर्णकर्कश आवाजापेक्षा सनई-ताशांचे मंजुर स्वर कधीही कानाला ऐकावेसे वाटतात. त्यामुळे जुन्या पद्धतीचे पारंपारिक वाद्य लोप पावत असताना याकूबभाई यांनी हि कला जिवंत ठेवण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक धरमचंद फुलफगर, प्रा डॉ बाळकृष्ण लळीत, प्रा ईश्वर पवार, मुख्याध्यापक व्ही डी कुलकर्णी, अनिल तांबोळी, रवींद्र सानप, बाबुराव पाचंगे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, अनिल कर्डिले, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे , मनसे विधि विभागाचे तालुका अध्यक्ष अँड. आदित्य मैड, रावसाहेब चक्रे , फिरोजभाई शिकीलकर, राजू आतार आदी मान्यवर उपस्थित होते.