रामलिंग महीला उन्नती तर्फे महिलादिनी विटभट्टी कामगार महिलांची मोफत आरोग्य तपासणी

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे) 8 मार्च हा दिवस सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो. परंतु समाजात असे काही वंचित घटक आहेत. ज्यांना महिला दिन म्हणजे काय आणि हा नक्की का साजरा केला जातो हे माहीत नसते. समाज्यातील कष्टकरी विटभट्टी कामगार महिला नेहमी कामात व्यस्त असतात त्यामुळे त्यांना स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे त्यांना काही दुखणं आल्यास सहसा त्या दवाखाण्यात जात नाहीत. म्हणुनच त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी, गोळ्या व औषध वाटप करण्याचा आम्ही सर्व मैत्रिणींनी निर्णय घेतल्याचे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.

काल (दि 8) रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रामलिंग येथील वीटभट्टी कामगार महिलांची आरोग्य तपासणी करून,त्यांना गोळ्या व औषध देण्यात आली. तसेच या कष्टकरी महिलांच्या हस्ते केक कापून महिला दीन साजरा करण्यात आला. यावेळी शिरुर तालुक्यातील अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या तसेच त्यांनी या कष्टकरी महिलांसोबत हा दिवस साजरा केल्यामुळे या कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता.

यावेळी बोलताना डॉ वैशाली साखरे म्हणाल्या, तुम्ही नेहमी संघटित रहा, तुमचे जीवन हे श्रममय असले तरी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका, तुमचे आरोग्य व्यवस्थित असेल तरचं तुम्ही व्यवस्थित आनंदी जीवन जगू शकता. तसेच कधीही आरोग्या संदर्भात काहीही तक्रारी असतील तर एक मैत्रीण म्हणून मला फोन करा, मी एक डॉक्टर म्हणून कायमच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल असे आश्वासन डॉ साखरे यांनी या कष्टकरी महिलांना दिले.

या आरोग्य तपासणीसाठी डॉ तुषार पाटील,आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, डॉ वैशाली साखरे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी पत्रकार किरण पिंगळे, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, अ‍ॅड सीमा काशीकर, सालेहा शेख, प्रीती बनसोडे, शुभांगी अभंग, ममता गोसावी, कल्पना पिल्ले, गायत्री देव्हाडे, अश्विनी ईसवे, प्रिया बिरादार, सुजाता पाटील तसेच अनेक मान्यवर महीला उपस्थित होत्या.