आमच्या आयुष्यात तुमचे स्थान खुपच महत्वाचे:- सुजाता पाटील

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे) ज्यांच्या मुळे आपल गाव, शहर स्वच्छ राहते. त्यांच्यामुळे आपण आसपासच्या परिसरात चांगले जीवन जगत असतो. कारण या महिला आहेत म्हणून स्वच्छता आहे. त्या प्रमाणिकपणे त्या कशाचीही तमा न बाळगता आपलं काम करत असतात. त्यामुळे अशा महिलांच्या आम्ही नेहमीच ऋणी आहोत. तुम्हाला जर काम करताना कोणीही त्रास दिला किंवा कुठेही तुमच्यावर अन्याय होत असेल, तर बिनधास्त आम्हाला सांगा आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत असे प्रतिपादन शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील यांनी केले.

शिरुर पोलिस स्टेशन तसेच महिला दक्षता समिती यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर (दि 7) रोजी शिरुर नगर पालिकेच्या सफाई कामगार महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डीले म्हणाल्या, तुमचे काम खूप छान असुन तुम्ही देशाची सेवाच करत आहात. नेहमी संघटित रहा, एकमेकिंना साथ द्या. कोणतीही अडचण असो महिला दक्षता समिती नेहमी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे कधीही अन्याय सहन करु नका, समाजात खंबीरपणे आणि मानाने जीवन जगा. आम्ही तुमचा गुलाबाचे रोप देऊन तुमचा सन्मान करत आहोत. त्यामुळे गुलाबाच्या फुलाप्रमाणे नेहमीचं दरवळत रहा.

यावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या सुषमा शितोळे म्हणाल्या, महिलांना कोणतेही काम करताना अनेक समस्या येत असतात. घर संभाळून ती बाहेरची काम करत असते, स्री नसेल तर घराला घरपण नसते. तसेच संसार करताना नवरा आणि बायको एकाच रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे एकमेकांना समजून तसेच साथ देऊन जीवनाचा गाडा चालवला पाहिजे. तुम्ही सर्व महिला आमच्यासाठी प्रेरणादायी आहात. त्यामुळे नेहमी आम्ही तुमचा सोबत आहोत.

शिरुर पोलिस स्टेशन येथील महिला दक्षता समिती नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. पोलिस स्टेशनला येणारे कौटुंबिक वाद नेहमी समुपदेशन करुन यातील सदस्य सोडवत असतात. महिला दक्षता समितीचा महिलांना मोठा आधार असुन जागतिक महिला दिनानिमित्त आपला सन्मान होत आहे. याचाया सफाई कर्मचारी महिलांना खूप आनंद झाला. त्यांनीही महिला दक्षता समितीच्या महिलांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या.

यावेळी महिला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा शशिकला काळे, महिला दक्षता समितीच्या सदस्या ललिता पोळ,अ‍ॅड सीमा काशीकर,अ‍ॅड सरिता खेडकर, डॉ स्मिता कवाद, नगरसेविका मनिषा कालेवार, सुवर्णा सोनवणे, श्रुतिका झांबरे, प्रियंका धोत्रे, शर्मिला निचीत, ज्योती हांडे, सारिका विर्सेव, आदिशक्ती महिला मंडळाच्या सचिव लता नाझिरकर, दिपाली आंबरे आदी महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकला काळे तर आभार राणी कर्डिले यांनी मानले.