crime

शिक्रापूर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) कासारी फाटा ते निमगाव म्हाळुंगी रोडच्या कडेला संशयितरित्या एक पिकउप उभी असून त्या वाहनांमध्ये चोरीच्या केबलचा माल असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी धडाकेबाज कारवाई करत मुद्देमालासह महाजन रामसमुच यादव (रा. खोपोली ता. खालापूर जि. रायगड ) आणि मोहम्मद हाफिज मोहम्मद जलील मन्सूरी (रा ,कुर्ला मुंबई) या दोन जणांना ताब्यात घेत शिक्रापुर येथील घरफोडी आणि केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार पंदारे, पोलिस हवालदार राजू मोमिन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे हे सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना कासारी फाटा ते निमगाव म्हाळुंगी रोडच्या कडेला संशयितरित्या एक पिकउप उभी असून त्या वाहनांमध्ये चोरीच्या केबलचा माल असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता महाजन रामसमुच यादव आणि मोहम्मद हाफिज मोहम्मद जलील मन्सूरी आणि अन्य एक असे तिघेजण रस्त्याच्या कडेला पिकउप क्र.MH 46 AF 2098 घेऊन संशययितरीत्या उभे असल्याचे दिसले. त्यात केबल आढळून आल्याने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरच्या केबल ह्या शिक्रापूर येथील व्यंकटेश साखर कारखान्यातुन चोरी केली असल्याचे सांगितले.

 

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपी, केबल व पिकअप वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत. आरोपीकडून पिकअप वाहनासह एकुण २ लाख ५४ हजार रु किमतीच्या केबलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे,पोलिस हवालदार जनार्दन शेळके , राजू मोमीन, योगेश नागरगोजे, चंद्रकांत जाधव, अतुल डेरे यांनी केली आहे..