लाखेवाडी येथील गायरान जमीन चोरीला…? जमीन दाखवा बक्षीस मिळवा

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): लाखेवाडी (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान गट तसेच गाव नकाशा वरील रस्ते, सर्वे नंबरचे रस्ते सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे १० एकर ३० गुंठे या सर्व क्षेत्रावर स्थानिक जमीनधारक मालकांनी अतिक्रमण केले आहे.

मौजे लाखेवाडी येथील सरकारी गायरान गट नंबर २३९ एकूण क्षेत्र १० एकर ३० गुंठे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भुमि अभिलेख शिरुर या कार्यालयाकडून सरकारी मोजणी होऊन ग्रामविकास अधिकारी यांना जमिन सापडत नाही.

अर्जदार रोहिदास शंकर मावळे यांनी गेली 3 वर्षापासून पाठपुरावा करुन लाखेवाडीतील सरकारी गायरान गटातील अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन सरकारी गायरान गटाची मोजणी केली असता मोजणी झाल्यानंतर माहिती अधिकारात अतिक्रमण झालेल्या क्षेत्राचे तसेच अतिक्रमण केलेले लोकांची यादी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे मागितली असता ग्रामविकास अधिकारी यांनी मोजणी झाल्यानंतर सदर माहिती उपलब्ध नाही असे लेखी पत्र दिले आहे. तसेच सदर अतिक्रमणधारकांना नोटीस देताना तत्कालीन सरपंच यांनी सही करण्यास नकार दिला आहे.

सरकारी मोजणी झाल्यावर सदर पत्रावर सही करण्यास नकार देणे याचाच अर्थ कुंपणच शेत खात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखेवाडीतील जमीनधारक मालकांनी सरकारी गायरान लगतधारक शेतकऱ्यांनी संपूर्ण क्षेत्रावर अतिक्रमण केलेले आहे. तसेच गाव नकाशावरील रस्त्यावर सुद्धा अतिक्रमण केलेले आहे वेळोवेळी तक्रार देऊन सरकारी अधिकारी राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास धजावत नाही.

लोकांच्या वहीवाटीसाठी व दळणवळणासाठी अतिक्रमणामुळे रस्ताच उपलब्ध नसल्याने नागरीकांची गैरसोय होत असल्याने भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून पातळीवर तातडीने लाखेवाडीतील गाव नकाशावरील, रस्त्यावरील अतिक्रमण तसेच गायरान गटातील अतिक्रमण शासकीय नियमाप्रमाणे काढून टाकण्यात यावे, अशी मागणी लाखेवाडी ग्रामस्थांकडून होत आहे.