शिरूरमध्ये मोठा गुटखा साठा उघड; १.१६ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई, आरोपीला अटक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील पुणे-अहिल्यानगर बायपासजवळील जिओ पेट्रोल पंपासमोरील परिसरात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १६ हजार ५४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी हिमांशु धर्मवीर सिंग (वय २३, रा. पुणे रोड, अहिल्यानगर) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ०८ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास, पोलीस कॉन्स्टेबल नितेश दत्तात्रय थोरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अहिल्यानगर परिसरातील जिओ पेट्रोलपंपासमोरील पुणे रोडलगत असणाऱ्या आदित्य स्नॅक्स सेंटरच्या मागील खोलीमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा करण्यात आलेला आहे. माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने तत्काळ छापा टाकत खोलीत प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचे पाकिटे मोठ्या प्रमाणात साठवले असल्याचे निष्पन्न केले.

जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित माल

क्र. उत्पादनाचे नाव एकूण पाकिटे एकूण किंमत (₹)

1) हिरा पान मसाला (₹176/पाकिट) 105 ₹18,488

2) विमल पान मसाला (₹198/पाकिट) 261 ₹51,678

3) गोवा 1000 (₹200/पाकिट) 27 ₹5,400

4) रॉयल 717 टोबॅको (₹44/पाकिट) 100 ₹4,400

5) विमल स्पेशल (₹470/पाकिट) 37 ₹17,390

6) व्ही वन टोबॅको (₹22/पाकिट) 220 ₹4,840

7) डायरेक्टर स्पेशल (₹250/पाकिट) 28 ₹7,000

8) शॉट 999 टोबॅको (₹125/पाकिट) 28 ₹3,500

9) विमल पान मसाला (₹187/पाकिट) 18 ₹3,366

एकूण ₹1,16,054/-

सदर प्रतिबंधित माल विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवलेला असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले असून, हा साठा महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्त कार्यालयाने १२ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेच्या विरोधात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 223 (अपायकारक अन्नपदार्थ विक्री), 274 (निषिद्ध औषध व अन्न पदार्थांची विक्री), 275 (बनावट लेबल लावलेला अन्नपदार्थ), 123 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अंतर्गत कलम 26(2)(1), 26(2)(iv), 27(3)(d), 27(3)(e), 30(2)(a), आणि 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे स्थानिक परिसरात गुटखा विक्रीवर चांगलाच आळा बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहे. शिरूरमध्ये गुटखा व तंबाखूसारख्या आरोग्यविघातक पदार्थांचा साठा करून विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. या प्रकारावर कठोर कारवाई होत राहिल्यास अशा गैरप्रवृत्तींचा बंदोबस्त होऊ शकेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.