शिरूरमध्ये बेकायदेशीर खोदाई रात्रीच्या अंधारात, पाईपलाईन फुटली तरीही शिरूर नगरपरिषद गप्पा का?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

नागरीक पाण्यापासून वंचित; मनसेचा प्रशासनाला जाब…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद हद्दीतील पाबळफाटा ते रिलायन्स पंप रस्त्यावर परवानगीशिवाय केबल टाकण्यासाठी बेकायदेशीर खोदकाम सुरू असून, यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खोदाईमुळे उपनगरातील प्रीतम प्रकाश नगर, वाडा कॉलनी, गुरुकुल सोसायटी व मंगलमूर्ती नगर या भागातील मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली असून, नागरिकांना पाण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.

सदर खोदकामा दरम्यान नुकत्याच तयार करण्यात आलेल्या गटारीला मोठे भगदाड पडले असून रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ही कामे कोणत्या मंजुरीवर सुरू आहेत, यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. परवानगी शिवाय केले जाणारे हे काम नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर मानले जात आहे.

या प्रकाराविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड आणि मनसेचे शिरूर शहर सचिव रवी लेंडे यांनी संयुक्त निवेदन सादर करत, संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“नगरपरिषदेच्या कोणतीही परवानगी न घेता शहरात बेकायदेशीर खोदाई केली जात आहे. यामुळे पाणी पुरवठा खंडित होतो, रस्ते खराब होतात, आणि नागरिकांचे हक्क हिरावले जातात. हे पूर्ण पणे असह्य आहे. ठेकेदारांवर व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई झालीच पाहिजे,” अशी रोषपूर्ण प्रतिक्रिया मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद यांनी दिली. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.