कान्हूरच्या अपघातग्रस्ताच्या मदतीस एकवटला सारा गाव

शिरूर तालुका

कान्हूर मेसाईतील अंकुश ननवरेंना गावकऱ्यांचा मदतीचा हात

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील अंकुश ननवरे यांचा अपघात झालेला असताना त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज असताना गावातील नागरिकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चक्क 51 हजार रुपयांची मदत संकलित करत सोशल मिडीयाचा चांगला वापर करत अपघातग्रस्त व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या अंकुश बबन ननवरे यांचा 2 दिवसांपूर्वी रांजणगाव MIDC मधून दुचाकीहून कामावरुन घरी येत असताना कंटेनरच्या धडकेत अपघात झाला. अपघात झाल्याचे कळताच गावातील प्रदीप उकिर्डे या युवकाने त्यांना तातडीने शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्या डोक्याला व कमरेला मार लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यांच्यावरील उपचारासाठी मोठा खर्च येणार असताना त्यांची परिस्थिती बेताची तर त्यांचा मुलगा देखील शालेय शिक्षण घेत असल्याने उपचारासाठी काय करायचे असा प्रश्न सर्वांसमोर उभा असताना त्यांच्या कुटुंबीयांनी काही रक्कम जमा करत उपचार करण्याची विनंती डॉक्टरांना केली. त्यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते शहाजी दळवी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदत करण्याची विनंती केली असता गावातील अनेकांनी मदत देत तब्बल 51 हजार रुपयांची मदत संकलित केली. त्यामुळे सोशल मिडीयाचा सदुपयोग कसा करता येतो हे कान्हूर मेसाईच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले, तर अनेकांनी सोशल मिडीयातून मिळालेल्या मदतीचे कौतुक देखील केले आहे तर ग्रामस्थांच्या मदतीने ननवरे कुटुंबियांना मोठा आधार लाभला आहे.

कान्हूर मेसाई ग्रामस्थांचा मदतीसाठी नेहमीच पुढाकार…

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे यापूर्वी देखील ग्रामस्थांनी दोन वेळा अपघात ग्रस्तांच्या तसेच पूर ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन सदर अपघात ग्रस्तांना मदतीचा हात दिला असल्यामुळे कान्हूर मेसाई ग्रामस्थांचा गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार असल्याचे दिसून येत आहे.