रांजणगाव गणपती येथे दारुड्यांचा धिंगाणा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीची फोडली काच

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील लांडे वस्तीनजीक असलेल्या कावळे विहिर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भाडेकरुच्या चारचाकी गाडीची काच दोन दारुड्यानी फोडली असुन काच का फोडली याचा जाब विचारायला गेलेल्या मालकाच्या नातेवाईकाला मारहाण करुन त्याच्याही दुचाकीचे नुकसान केल्याची गंभीर घटना घडली आहे. तसेच ज्या दोन व्यक्तींनी गाडीचे नुकसान केले त्यांचा त्याच परिसरात अनधिकृत दारुचा व्यवसाय असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यावर कारवाईची मागणी केली आहे.

 

रांजणगाव गणपती येथील लांडे वस्तीनजीक कावळे विहीर परिसरात रस्त्याच्या कडेलाच एका पत्र्याच्या लोखंडी शेड मध्ये अनधिकृतपणे दारु विक्रीचा व्यवसाय चालत असुन त्याठिकाणी आजूबाजूला अनेक भाडेकरु राहत आहेत. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिला तसेच लहान मुलींना या तळीरामांचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय चालविणारे दोघेही येथील स्थानिक रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांना कोणीच काही बोलत नाही.

 

रविवार (दि 17) रोजी रात्रीच्या सुमारास हे दोघेही दारु व्यावसायिक पिऊन तर्रर्रर्र झाले होते. त्यावेळी लांडेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ रस्त्याच्या कडेला जवळच भाड्याने राहणाऱ्या भाडेकरुची चारचाकी उभी असताना या दोन तळीरामांनी गाडी इथं का लावली या कारणावरुन त्या गाडीच्या काचा फोडत नुकसान केले. त्यानंतर संबंधित मालकाचा एक नातेवाईक त्यांना याबाबत जाब विचारण्यासाठी गेला असता. त्यालाही मारहाण करत त्याच्या दुचाकीचे या दोघांनी नुकसान केल्याचे समजते.

 

त्यामुळे हा अनधिकृत दारुचा व्यवसाय बंद करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या दोन व्यक्ती रहदारीच्या परिसरात अनधिकृत दारुचा व्यवसाय नक्की कोणाच्या आशीर्वादाने करतात अशी दबक्या आवाजात चर्चा असुन रांजणगाव MIDC पोलिस आता यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.