केंदूर मध्ये शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे केंदूर गावचे सुपूत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या जयंतीच्या. निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करुन शहीद प्रदीप ताथवडेंना चित्रकलेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील भूमिपुत्र शूरवीर किर्तीचक्र प्राप्त शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांनी जम्मू काश्मीरच्या पूँछ सिमेलगत अतिरेक्यांचा माग काढत काही अतिरेक्यांना यमसदनी धाडले. यावेळी एका अतिरेक्याने मेजर प्रदीप ताथवडेंवर हल्ला केल्याने ते जखमी झाले. मात्र जखमी अवस्थेत देखील त्यांनी अतिरेक्यांशी दोन हात करत आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले परंतू अती रक्तश्राव झाल्याने त्यांना विरमरण आले. अशा शुरवीर, देशप्रेमी सुपूत्राच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या महान वीरपुरुषाचा परिचय होण्यास मदत झाली.

सदर स्पर्धेमध्ये कलाशिक्षक संजय जोहरे यांच्या मार्गदर्शनाने तब्बल 111 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मात्र स्पर्धेत लहान गटात प्रियांका संदीप सुक्रे हिने प्रथम क्रमांक, हर्षदा किरण साकोरे हिने द्वितीय क्रमांक, श्लोक रमेश विधाटे याने तृतीय क्रमांक तर श्रुतिका सतिश सुक्रे हिने उत्तेजनार्थ आणि मोठ्या गटात मोहिनी दत्तत्रय गावडे हिने प्रथम क्रमांक, शिवराज शरद शिंदे याने द्वितीय क्रमांक, वैष्णवी गणेश लोखंडे हिने तृतीय क्रमांक तर मुसरत राजु शेख हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवीत यश संपादित केले सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी केंदूरचे सरपंच अविनाश साकोरे, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सदाशिवराव थिटे, प्राचार्य अनिल साकोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल ताथवडे, पांडुरंग ताथवडे, गुलाबराव थिटे यांसह विद्यालयातील शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी विद्यार्थी दशेतच वीर भूमिपूत्राच्या शौर्याची गाथा विद्यार्थ्यांना माहीती व्हावी यासाठी विद्यालयाने सुरु केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती सदाशिवराव थिटे यांनी सांगितले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कलाशिक्षक संजय जोहरे यांचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव सीताराम गवळी यांनी अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत थिटे यांनी केले तर दशरथ सुक्रे यांनी आभार मानले.