महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरुर-आंबेगाव तालुकाध्यक्षपदी नानासाहेब लांडे यांची निवड

राजकीय शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील नानासाहेब भाऊसाहेब लांडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरुर-आंबेगाव तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. मनसेचे नेते राजेंद्र (बाबु) वागसकर, मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे तसेच मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पञ देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नानासाहेब लांडे यांची शिरुर-आंबेगावच्या तालुकाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे आणि तत्वे आदी संघटनेत व समाजात निष्ठेने राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नानासाहेब लांडे यांनी सांगितले.

नानासाहेब लांडे यांनी यापुर्वी मनसेच्या चिञपट सेना व कामगार सेनेच्या माध्यमातून भरीव अशी कामगिरी केली आहे. तसेच रांजणगाव परिसरात किल्ले बनवा स्पर्धा, भजन स्पर्धा, लहान मुलांसाठी ऐतिहासिक चिञपटांचे मोफत शो तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांच्या कुशल व अकुशल कामगारांना न्याय मिळण्यासाठी ही नानासाहेब लांडे यांनी काम केले आहे. माझ्या या सामाजिक कामामुळेच पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली असल्याचे नानासाहेब लांडे यांनी सांगितले.