शिक्रापुरात सर्पमित्र युवतीने पकडला चक्क आठ फुटी धामण साप

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका दुकानात आढळून आलेल्या आठ फुटी धामण जातीच्या सापाला चक्क एका सर्पमैत्रीण युवतीने पकडून सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले असून सर्पमित्र युवतीच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अजिंक्यतारा पार्किंग येथील कुमजाई ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आज सकाळच्या सुमारास एक भलामोठा साप असल्याचे नाना इंदलकर यांना दिसले त्यांनी तातडीने याबाबतची माहिती सर्पमैत्रीण पूजा बांगर यांना दिली. त्यानंतर सर्प मैत्रीण पूजा बांगर, सर्पमित्र अमोल कुसाळकर, विक्रम ठाकूर, विशाल वाकळे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता आत मध्ये कपाटाच्या खाली भलामोठा धामण जातीचा साप दिसून आला.

दरम्यान पूजा बांगर हिने शिताफीने सदर धामण जातीच्या सापाला पकडले यावेळी पाहणी केली असता तब्बल 8 फुट लांबीचा धामण जातीचा साप असल्याचे समोर आले, तर एका युवतीने पकडलेल्या भल्या मोठ्या सापाला पाहून नागरिक देखील आचंबित झाले तर अनेकांनी युवतीचे कौतुक केले. त्यानंतर शिरुर वनविभागाचे वन रक्षक प्रमोद पाटील यांना माहिती देत सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.