शिक्रापुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे रस्त्याच्या कडेला उभा राहुन क्रिकेट मॅच बघणाऱ्या मेहुण्याला जुन्या वादातून त्याचा दाजी आणि त्याच्या तीन मित्रांनी बॅट व स्टंप ने बेदम मारहाण केल्याप्रकरणी मेहुण्याने शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन किरण बबनराव थिटे, राम भोकनळ, लखन भोकनळ, सत्यम खेडकर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नितीन शहाजी दळवी (वय ३८) याच्या बहीणीचे कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील किरण बबनराव थिटे याच्या सोबत दहा वर्षापुर्वी लग्न झाले होते. गेले दोन वर्षांपुर्वी किरण थिटे याने फिर्यादीच्या बहिणीला सोडुन देत दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केले. त्यानंतर किरण थिटे यांनी रागात येऊन फिर्यादीची आई आणि बहीण यांना घरी येऊन मारहाण केली होती.
दि १८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादी नितीन दळवी हा कारेगाव येथुन चारचाकी कारने त्याचा मित्र सागर मलगुडे याच्यासोबत धामारी गावाला कामानिमित्त चालला असताना दुपारी १ च्या सुमारास कान्हूर मेसाई गावच्या हद्दीतील धामारी रोडच्या कडेला मोकळ्या जागेत क्रिकेट मॅच चालू होती. त्यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र सागर मलगुंडे असे गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करुन क्रिकेट मॅच पाहत होते. क्रिकेट मॅच संपल्यानंतर तेथे फिर्यादीचा दाजी किरण बबनराव थिटे हा हातामध्ये लाकडी क्रिकेटची बॅट घेऊन आला. त्याच्यासोबत राम भोकनळ, लखन भोकनळ, सत्यम खेडकर क्रिकेट स्टंप घेऊन आले.
अचानक हे सर्वजण फिर्यादी येऊन त्याला शिव्या देऊन तू आमच्या गावात आला कसा असे बोलले. त्यानंतर फिर्यादीने मी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी थांबलो आहे असे सांगितले. त्यावेळी किरण थिटे याने फिर्यादीला शिवीगाळ करत ‘तुला कोर्टात केस चालवायची जास्त हौस आहे. तुला आज दाखवतोच’ असे म्हणत त्याच्या हातातील क्रिकेटची लाकडी बॅट फिर्यादीच्या डोक्यात मारली. त्यावेळी फिर्यादीच्या डोक्यातुन रक्त येऊ लागले. त्यानंतर राम भोकनळ, लखन भोकनळ, सत्यम खेडकर यांनीही त्यांच्या हातातील स्टंपने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी त्यांचे मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी होऊन खाली पडला असता त्याचा मित्र सागर मलगुंडे याने मारहाण करणाऱ्यांना थांबवले. त्यावेळी राम भोकनळ याने ‘तु परत या गावात दिसलास तर तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. फिर्यादी नितीन दळवी याला जखमी अवस्थेत त्याचा मित्र सागर मलगुंडे याने दवाखान्यात नेले. या घटनेचा पुढील अधिक तपास शिक्रापुरचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे करत आहेत.