लाखेवाडी शाळेत ‘सीड एटीएम बाॅल’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): लाखेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप यांनी विद्यार्थी व सहकारी शिक्षक शिवाजी भुजबळ यांच्या मदतीने “सिड एटीएम बॉल” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून मातीपासून लहान लहान बाॅल शाळेतच तयार करुन घेतले. त्या प्रत्येक बाॅल मध्ये कडूनिंब, जांभूळ, चिंच, गुलमोहर, सिताफळ अशा विविध प्रकारच्या दोन बिया टाकून तो बाॅल तयार करुन घेतला. असे जवळपास १ हजार बाॅल तयार केले. यापैकी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 बाॅल देऊन ते आपल्या घराभोवती किंवा शेतात ते बाॅल कुदळीने लहान खड्डा घेऊन लावायचे व त्याला पाणी घालून ते झाड वाढवायचे, असे सांगितले.

एका वर्षात विद्यार्थी जेवढी झाडे जगवतील तेवढ्या झाडाच्या संख्येएवढ्या छोट्या छोट्या शालेय वस्तू त्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप स्वखर्चाने भेट देणार आहे. उरलेले “सीड एटीएम बाॅल” मंदिराच्या परिसरात लावणार आहे. यापूर्वीही शालेय आवारात खडकाळ जमिनीत चर खोदून लावलेली झाडे 100 टक्के जगवली आहेत. त्या झाडांमुळे शालेय परिसर सुशोभित झाला आहे. एकंदरीतच संपूर्ण शाळेला रंगरंगोटी व स्वच्छ परिसर आणि हिरव्यागार झाडाफुलांनी नटलेली शाळा परिसरासाठी एक आदर्श माॅडेल म्हणून उभे राहिले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झाल्याचे मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर ,विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर साहेब,केंद्रप्रमुख रामदास बोरूडे व लाखेवाडी ग्रामस्थांनी भरभरुन कौतुक केले व शाळेला अशा नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कायमस्वरुपी सहकार्य व मदत करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. “सीड एटीएम बाॅल” हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यामागचा खरा उद्देश विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयी आस्था निर्माण होऊन वृक्ष लागवडीकडे विद्यार्थी आकर्षिले गेले पाहीजे. विद्यार्थ्यांनी स्वतः मातीचे बाॅल तयार करुन त्याच्यात वेगवेगळ्या बियांची लागवड केल्याचा आनंद त्यांना मिळाल्यामुळे ते त्या वृक्षांचे नक्कीच संगोपन करतील. लावलेली झाडे जगवल्यानंतर शालेय वस्तू बक्षीस देण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थी पर्यावरण प्रेमी व वृक्षप्रेमी बनावेत हाच आहे.”असे लाखेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.