शिरुर तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी दिव्यांगाचे आंदोलन

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने शिरुर तहसिल कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.यावेळी शिरुर तालुक्यातील दिव्यांगाना पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे तसेच अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य देण्यात यावे.संजय गांधी निराधार पेन्शन योजना वेळेवर दर महिन्याला देण्यात यावी. संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या दिव्यांगांची प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावी. संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय तळमजल्यावर करण्यात यावे अशा अनेक मागण्यासाठी अनेक दिव्यांग बांधवानी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन केले.

यावेळी भूमिहीन बेघर दिव्यांगाना राहण्यासाठी एक गुंठा जागा देण्यात यावी. तालुकास्तरावर आमदार अध्यक्ष व तहसीलदार सचिव असलेल्या 5% दिव्यांग निधी खर्च निवारण समिती तात्काळ गठीत करण्यात यावी.रांजणगाव MIDC मध्ये दिव्यांगासाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करावे या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. परंतु आठ दिवस आधी आंदोलनाचे निवेदन देऊनही शिरुरचे प्रभारी तहसिलदार बालाजी सोमवंशी कार्यालयात गैरहजर असल्याने तसेच इतर कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे सर्व दिव्यांगानी जर आम्हाला न्याय मिळत नसेल आणि वारंवार तहसिल कार्यालयात चकरा मारुनही आमची कामे होत नसतील तर आम्ही इथेच आत्मदहन करु असा निर्वानीचा इशारा दिला. त्यामुळे तहसिलदार यांनी फोन करुन दिव्यांग बांधवांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचे तसेच लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन घेण्यात मागे घेण्यात आले.

या आंदोलनात प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव, पुणे जिल्हाध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा अनिता कदम, शिरुर तालुका अध्यक्ष कुंडलिक वायकुळे, महिलाध्यक्षा ज्योती हिवरे, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, संभाजी नवले, निचित बाबा, नयना परदेशीं, वंदना शिरतोडे, नारायण नवले, वंदना रामगुडे, खंडेराव गोरडे, सागर सारंगधर, बाळू साकोरे तसेच बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.