रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिलादिन साजरा

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) तुम्हाला जिथे गरज आहे तिथे आशा वर्कर या प्रमाणिकपणे काम करत असतात. त्यांच्या या कार्याला माझा नेहमीच सलाम आहे. तुमच्या त्या कामाची पावती म्हणूनच महिला दिनानिमित्त मी आशा वर्कर यांचा सन्मान केला. तुम्हाला कधीही कुठेही काहीही अडचण आली तरी मी नेहमी तुमच्या सोबत आहे. तुमचे काम खरंच चांगले असुन त्यात कधीही कमीपणा समजू नका. चांगल्या कामाची पावती नेहमी चांगली मिळते असे मनोगत राणी कर्डिले यांनी व्यक्त केले.

 

सगळीकडे 8 मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 8 मार्च रोजी महाशिवरात्री असल्याने रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दसगुडे मळा (रामलिंग) येथे शेतकरी महिला तसेच आशा वर्कर यांच्यासोबत महिलादिन साजरा केला. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

 

यावेळी महिलांचे उखाणे तसेच त्यांच्या सोबत विविध विषयांवर संवाद साधला. दिवसभर शेतीत काबाडकष्ट करताना महिलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. शेती आणि घरकाम एवढेच आमचे जग आहे. त्यामुळे बाहेरचे जग आम्हाला माहीत नाही. पण आज तुम्ही येऊन आमच्याशी संवाद साधत आमच्या अडचणी समजुन घेतल्या असे महिलांनी यावेळी सांगितले. तसेच कोणावरही संकट आले तर आम्ही सर्व एकजुटीने त्यांना मदत करत असतो असे या महिलांनी सांगितले.

 

समाजामध्ये तळागाळात काम करणाऱ्या आशा वर्कर यांचे कार्य खुप कौतुकस्पद आहे. अत्यंत कमी मानधन असतानाही त्या आरोग्यसेविका म्हणुन काम करत असतात. त्यांचाही सन्मान होणे आवश्यक आहे. म्हणुन महिला दिनानिमित्त आशा वर्कर यांनाही साडी चोळी देऊन संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आला.

 

यावेळी कार्यक्रमाला अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या. त्या सर्वांना प्रमुख पाहुण्या म्हणुन मान देण्यात आला. हिराबाई दसगुडे, मंदाबाई दसगुडे, चंदाबाई दसगुडे, ताराबाई दसगुडे या महिला होत्या. तसेच आशा वर्कर कौशल्या दसगुडे, मिरा दसगुडे, महाजन तसेच ग्रामपंचायत सदस्या नंदा दसगुडे, अंगणवाडी शिक्षिका उर्मिला दसगुडे, कविता दसगुडे, बायसाबाई दसगुडे, मयुरी दसगुडे आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.