रांजणगाव गणपती येथे हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने बाप्पुसाहेब शिंदे यांची जिल्हा परिषदेची तयारी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांपुर्वी शिरुर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. त्याच पार्श्वभुमीवर शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी रांजणगाव गणपती येथे भव्य हळदी-कुंकू समारंभ घेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या तयारी सोबतच स्वतःच्या जिल्हा परीषद निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

 

सध्या देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची वेगवेगळे पक्ष तयारी करत असताना शिरुर तालुक्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची काहीजण तयारी करत असल्याचे दिसत आहे. रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परीषद गटात अनेकजण इच्छुक असताना आता शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडुन बापुसाहेब शिंदे हे आता मैदानात उतरणार आहेत.

 

त्यामुळे आता रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परीषद गटात शेखर पाचुंदकर, सतिश पाचंगे, मानसिंग पाचुंदकर, यांच्या नंतर आता बापुसाहेब शिंदे यांनीही निवडणुक लढविण्याचे संकेत दिल्याने आगामी काळात या गटात मोठी चुरस पहायला मिळणार आहे. शिंदे हे माजी खासदार तसेच म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत.

 

तसेच काही महिन्यांपुर्वी झालेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी मानसिंग पाचुंदकर आणि भिमाजी खेडकर यांच वर्चस्व असलेल्या वार्डात स्वतःच एकही मत नसताना स्वतःची पत्नी अर्चना यांना उभं करत अटीतटीच्या लढतीत विजय खेचून आणला. ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे यांचा पॅनल पडला मात्र शिंदे यांची पत्नी अर्चना शिंदे यांचा विजय मात्र विरोधकांना फारच जिव्हारी लागला. तसेच रांजणगाव विविध सहकारी कार्यकारी सोसायटीचे सध्या बापुसाहेब शिंदे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सहकारी सोसायटी नंतर शिंदे हे जिल्हा परीषदेची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

 

रांजणगाव येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने महिलांसाठी यावेळी क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत ‘न्यु होम मिनिस्टर’ कार्यक्रमात जिल्हा परीषद गटातील हजारो महिलांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात प्रथम क्रमांक माधुरी निलेश कुंभार (इलेक्ट्रिकल बाईक), द्वितीय क्रमांक नम्रता अनिल पंचमुख (फ्रिज), तृतीय क्रमांक प्रियांका आदित्य ढसाळ (वॉशिंग मशीन), चतुर्थ क्रमांक सुवर्णा प्रविण पिसाळ (पीठगिरणी), मोनिका अक्षय शेळके (एलईडी टिव्ही), शिवकन्या भिमाजी गित्ते (कुलर), कविता सुनील मुळे (मिक्सर) अशी बक्षिसे देण्यात आली. हे बक्षीस वितरण भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पना आढळराव पाटील, कौशल्या शिंदे, रांजणगावच्या ग्रामपंचायत सदस्या अर्चना शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, रांजणगावच्या सरपंच सुवर्णा वायदंडे, सोनेसांगवीच्या सरपंच रेखा काळे, खंडाळेच्या सरपंच सारीका खेडकर, निमगाव भोगीच्या सरपंच उज्वला इचके, पिंपरी दुमालाच्या सरपंच गायत्री चिखले, गणेगाव खालसाच्या सरपंच मंदा ढसाळ, बुरुंजवाडीच्या सरपंच पुनम टेमगिरे, रांजणगावच्या माजी सरपंच सुषमा शेळके, शिवसेनेच्या अश्विनी जाधव, सिमा पवार, मिना गवारे, साधना शिंदे तसेच हजारो महिला उपस्थित होत्या.