जातेगाव बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून शाळेचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची माहिती मुख्याध्यापक विजय गायकवाड यांनी दिली आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेत असून सदर शाळेने शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सर्व नियमावलींचे पालन करत शाळेला आदर्श केले असता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक विभागातून जिल्हा परिषद शाळा जातेगाव बुद्रुक या शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून शाळेचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले असल्याचे पत्र देखील शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शाळेला दिले आहे, तर शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने मुख्याध्यापक विजय गायकवाड यांचा नुकताच ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत पवार, उपाध्यक्ष वर्षा इंगवले, पोलीस पाटील चित्रा इंगवले, प्राचार्य रामदास थिटे, प्राचार्य ललित इंगवले यांसह आदी उपस्थित होते.