एक जानेवारीच्या यशस्वी बंदोबस्ताबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे होणारा २०५ वा शोर्यदिन शांततेत पार पाडण्यासाठी जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर असताना पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावत कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सन्मानचिन्ह देत सन्मान करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी होणारा शौर्यदिन शांततेत पार पाडण्याचे आव्हान पोलीस अधिकाऱ्यांसमोर असते. यावर्षी देखील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याने सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले असल्याने नुकतेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिरुर तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. श्री राजेशजी देशमुख साहेब, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, यांचा शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, सरपंच रमेश गडदे, वकील संघटनेचे कार्याध्यक्ष एडवोकेट संपतराव ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत या अधिकाऱ्यांचा देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिरुर तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर यावेळी बोलताना केलेल्या कार्याचे कौतुक होणे गरजेचे असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.