शिक्रापुरात विजेच्या खांबावर टेम्पो आदळल्याने नागरिक अंधारात

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे पुणे नगर महामार्गावर पहाटेच्या सुमारास 1 टेम्पो विजेच्या खांबावर आढळल्याने विजेचा पूर्ण खांब पडून व वीज वाहक तारा तुटल्याने सर्व नागरिकांना अंधारात राहून उष्णतेचा सामना करण्याची वेळ आली. मात्र विद्युत वितरण विभागाच्या तत्परतेने अनर्थ टळला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून पहाटेच्या सुमारास एम एच १७ ए जी ६६०३ हा टेम्पो अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे जात असताना बजरंग वाडी येथे आल्यानंतर टेम्पो चालकाला झोप लागू लागल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळला यावेळी संपूर्ण विजेचा खांब टेम्पोवर कोसळून विजेच्या तारा तुटल्या आणि परिसरात अंधार पसरला. मात्र यावेळी विजेच्या तारा तुटल्याने अनेक ठिकाणी तारांचे घर्षण होऊ लागले.

मात्र याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सांडभोर यांनी तातडीने विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना दिली असता विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेत विज पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर दुपारपर्यंत विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन विजेचा खांब उभा करत सर्व तारा पूर्ववत जोडल्या आणि दुपारनंतर वीज पुरवठा सुरू झाला परंतु तोपर्यंत सर्व नागरिकांना उष्णतेच्या त्रासाला सामोरे जावे लागले.