शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या मागणीसाठी शिरूर तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळाने सोमवारी (दि. ७) राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन निवेदन दिले.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सलग २७ वर्षे शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील शेतकरी कारखान्याला ऊस पुरवठा करीत आहेत. या शेतकऱ्यांचे कारखान्याशी गेल्या अनेक वर्षांपासून विश्वासाचे आणि सहकार्याचे नाते निर्माण झाले आहे. कारखान्याला सातत्याने ऊस गाळपासाठी देण्याबरोबरच कारखान्याच्या भागभांडवलासाठी शेतकऱ्यांनी शेअर्सही घेतले आहेत.
या सर्व बाबींची साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांना माहिती देऊन शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सभासदत्वाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. कारखान्याशी दीर्घकाळ आर्थिक व व्यावसायिक संबंध असलेल्या शेतकऱ्यांना सभासदत्वाचा योग्य तो विचार व्हावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. कारखान्याचे उपविधी तसेच सभासदत्वासंदर्भातील तांत्रिक व प्रशासकीय बाबींवरही चर्चा करण्यात आली. यासाठी प्रादेशिक सहसंचालक, साखर, पुणे विभाग प्रगती बागल यांच्याशी चर्चा करून त्यानंतर साखर आयुक्तांना निवेदन साद करण्यात आले.
शिरूर तालुक्यातील ४२ गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही भेट आणि निवेदन महत्त्वाचे ठरले असून, शेतकऱ्यांच्या सभासदत्वाचा प्रश्न सकारात्मक पद्धतीने मार्गी लागण्याची अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.
आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!
नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!
आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!
आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!