शिरुर तालुक्यात भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी उपाययोजना करा…

शिरूर तालुका

भाजपा युवा मोर्चाची प्रदेशाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यामध्ये अनेक भूमिपुत्र बेरोजगार असून त्यांना तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत करण्यात आली आहे.

शिरुर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेवक अमोल बालवडकर, संघटन सरचिटणीस संदिप सातव, गौरव झुरूगे, शिरूर तालुकाध्यक्ष रोहित खैरे, केशव पाचर्णे, समीर झुरुंगे, विशाल इंगळे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत शिरुर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने असून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारापासून डावलले जात आहे. युवकांना रोजगार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने याबाबत उपाययोजना करत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना लवकरच शिरुर तालुक्यात याबाबत बैठक आयोजित करुन कारखानदारांशी चर्चा करत मार्ग काढला जाईल असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.