shirur-taluka-logo

मुखईच्या आश्रम शाळेने जोपासली रक्षाबंधनाची परंपरा

शिरूर तालुका

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे रक्षाबंधन निमित्ताने विद्यालयातील सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधत आपल्या रक्षणाची जबाबदारी मुलांवर देत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला आहे.

मुखई (ता. शिरुर) येथे सन २००४ मध्ये कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु झालेले असून सदर विद्यालय सुरु झाल्यापासून अद्याप पर्यंत कोणताही खंड न पडता रक्षाबंधन साजरा करण्यात आला असून सदर आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध सण, उत्सव व उपक्रम प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित होत असतात. त्याप्रमाणेच नुकताच पार पडलेला रक्षाबंधन सण मोठ्या आनंद व उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख सविता लिमगुडे, सिमा पाटील, रुपसिंग मल्लाव यांच्या नियाजानातून पार पडलेल्या कार्यक्रम दरम्यान प्रत्येक वर्गातील मुलीने मुलांना राखी बांधत आपल्या भावाला राखी बांधण्याचा आनंद घेतला. याप्रसंगी आश्रमशाळा हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातील आपण सर्वजण सदस्य आहोत. त्यातीलच बहीण आणि भावाचे एक पवित्र नाते आहे असे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांच्या रक्षाबंधन बरोबरच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील याप्रसंगी घेण्यात आला.