बुरुंजवाडीत घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका

शिरूर तालुका

शिक्रापूर: बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे सकाळच्या सुमारास दुर्मिळ गव्हाणी घुबडावर कावळ्यांचा हल्ला सुरु असताना घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका करून जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे.

बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे आज सकाळच्या सुमारास 25 ते 30 कावळे घुबडावर हल्ला करत असल्याचे शरद टेमगिरे व सागर रुके यांना दिसून आले. त्यांनी तातडीने निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देत घुबडाला कावळ्यांच्या हल्ल्यातून संरक्षण दिले. दरम्यान निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पा-हणी केली असता तेथे एक दुर्मिळ गव्हाणी घुबडावर कावळ्यांनी हल्ला केल्याचे दिसून आले.

यावेळी शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी शिताफीने सदर दुर्मिळ गव्हाणी घुबडाला ताब्यात घेतले यावेळी शरद टेमगिरे, सागर रुके यांसह आदी उपस्थित होते, तर त्या घुबडाची पाहणी केली असता घुबड व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आले.

याबाबतची माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना माहिती देण्यात आली असून त्या दुर्मिळ घुबडाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात येणार असल्याचे अमोल कुसाळकर यांनी सांगितले.