शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत बोकाळली गुन्हेगारी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी, फोर व्हीलर चोऱ्या, विद्युत मोटारी,केबल चोऱ्या, सोनसाखळी चोऱ्या, दरोडा, जबरी चोऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण,खुण, बलात्कार अशा घटनांचा आलेख गेल्या 2 वर्षापासून सातत्याने वाढतच चालला आहेत.

नुकतेच शिरूर पोलिस स्टेशनमधील वाहन चालक पोलिस कॉन्स्टेबल दिपक नागरे याच्यावर अज्ञात व्यक्तीनी कोयत्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. 5 दिवस उलटूनही आरोपी अद्याप निष्पन्न होऊ शकले नसून या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. जर पोलिसच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरीकांचे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दिड वर्षापुर्वी मलठणच्या शिंदेवाडी, ग्रामीण रुग्णालय परिसर, बोऱ्हाडेमळा या ठिकाणी रहस्यमय मृत्यू झालेल्या 3 अनोळखी प्रेतांचे शिरूर पोलिसांकडून उदयाप गुढ उकलले नाही. तसेच उरळगाव येथे (दि. ८) जानेवारी २० २२ रोजी एका अज्ञात महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत सापडले होते. हा खुण कुणी व कशासाठी केला? याचा शोध अद्याप लागला नाही. तसेच अदयापपर्यंत या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.तोच पुन्हा निमोणे येथे दोन महीन्यांपुर्वी मनोहर शितोळे यांना अज्ञात व्यक्तीने चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा निर्घृणपणे खुन केला आहे. तसेच खुण झालेल्या नातेवाईकांच्या येथे एका शेतमजूर कामगाराने आत्महत्या केली आहे. हा शेतमजुर कुठला व त्याने का आत्महत्या केली? त्याचा शोध अद्याप लागला नाही.

तसेच शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी (माळीमळ्यात) मध्ये श्री तुकाई देवी मंदिरात (दि. २) जानेवारीला रात्री धाडसी चोरी झाली होती. यात चोरट्यांनी तिजोरी, कपाट, देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, देवीचे डोळे, रोख रक्कम असा सुमारे 9 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. अदयाप त्याचीही उकल होऊ शकली नाही. शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत चोरट्यांचा अनेक दिवसांपासून धुमाकूळ चालूच आहे.

शिरूर पोलीस प्रशासन नुसतं आश्वासन देऊन दिशाभूल करत असल्याचे मत सुजाण नागरीक व्यक्त करत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात कायद्याचे राज्य आहे का?हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. येत्या आठवड्यात शिरूर पोलिस स्टेशन सहपुणे जिल्हयातील इतर पोलिस स्टेशनला कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक इन्स्पेक्शनसाठी येणार आहे. शिरुर पोलिस स्टेशनची रंगरंगोटी करुन जोरदार तयारीही झाली आहे.

शिरूर पोलिस स्टेशनची हद्द मोठया प्रमाणावर विखुरली असून अपूरे आधिकारी, कर्मचारी असल्याने आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण येत आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचा कार्यकाल पुर्ण होत आहे. त्यांच्या जागी नारायण सारंगकर, दयानंद गावडे यांसारख्या खमक्या पोलिस आधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.