ranjangaon-midc-police station

रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना

क्राईम शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा (अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ) अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे खून करुन त्यांचे मृतदेह पेटवुन दिल्याची घटना रविवार (दि २५) रोजी समोर आली असुन या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या घटनेनंतर पुणे ग्रामीणचे नवनिर्वाचित पोलिस अधिक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. या हत्याकांडातील आरोपीचा शोध घेण्यासाठी रांजणगाव पोलिसांनी १५ ते १६ पथके तयार केली असुन या पथकात रांजणगाव, शिरुर, शिक्रापुर या पोलिस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकातील काही कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील काही कर्मचारी या घटनेतील आरोपीचा कसुन शोध घेत आहेत.

 

तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते १६ पोलिस पथके वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मयत तसेच आरोपी विषयी माहिती घेत आहेत. रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव, ढोकसांगवी, रांजणगाव गणपती या गावात जाऊन भाड्याने राहणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधुन मयत महिलेविषयी माहिती गोळा करत आहेत.

 

रांजणगाव येथील अहिल्यानगर हायवेजवळ, ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस आई व दोन लहान मुलांचे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले असुन हे मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र, प्राथमिक तपासणीत मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले (tattoo) असल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्याचा आधार घेऊन पोलिस पुढचा तपास करत आहेत.

 

नवनियुक्त SP संदीपसिंग गिल यांच्यापुढे आव्हान…?

नवनियुक्त पोलिस अधिक्षक संदीपसिंग गिल यांनी पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारताच रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली. तीन दिवस होऊनही मयत महिलेच्या नातेवाईकाबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे या घटनेतील मयत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेणे आणि यातील आरोपी निष्पन्न करण्याचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक संदीपसिंग गिल, गुन्हे अन्वेषण शाखा आणि रांजणगाव पोलिस यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या

रांजणगाव पोलिसांची जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई; १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक