शिक्रापुरात कावळ्यांच्या तावडीतून घुबडास जीवदान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका सोसायटी जवळ कावळ्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या दुर्मिळ अशा गव्हाणी घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका करत जीवदान देण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील मनीषा विहार नजीक एका घुबडावर काही कावळे हल्ला करत असल्याचे आण्णा पडवळ यांना दिसले त्यांनी तातडीने निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना माहिती दिली असता शेरखान शेख, अमोल कुसाळकर, पूजा बांगर यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता तेथे एका दुर्मिळ अशा गव्हाणी घुबडावर कावळा हल्ला करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी प्राणीमित्रांनी शिताफीने सदर दुर्मिळ गव्हाणी घुबडाला ताब्यात घेतले यावेळी आण्णा पडवळ, कांतीलाल भुजबळ यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान याबाबत शिरुर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक प्रमोद पाटील यांना माहिती देत सदर घुबडाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले, तर याबाबत बोलताना कोठेही जखमी पशु पक्षी आढळून आल्यास वनविभाग तसेच जवळील प्राणीमित्रांना माहिती देण्याचे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे.