विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे सुमारे १०० ते ११० मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधी उपस्थित होते.

दि. २४ रोजी झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांची सुरक्षा, विद्यार्थिनींचे संरक्षण, सायबर गुन्हे प्रतिबंध, शाळा परिसरातील कायदा व सुव्यवस्था तसेच शाळा व पोलीस प्रशासनातील समन्वय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापकांनी शाळांसमोरील विविध समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. त्यावर पोलीस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, तक्रार पेटी बसविणे, शाळा परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर विद्यार्थिनींची छेडछाड, टवाळखोरी अथवा अन्य अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत ‘गुड टच – बॅड टच’ विषयावरील जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराची माहिती पालक, शिक्षक किंवा पोलिसांना त्वरित देण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यापूर्वी सेवा बजावलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. महिला सुरक्षा जनजागृती, बालसंरक्षण अभियान, शाळा-महाविद्यालयांतील मार्गदर्शन कार्यक्रम तसेच छेडछाडविरोधी उपक्रमांमुळे त्यांनी संवेदनशील व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्रापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीचीच प्रचिती देणारा ठरत आहे.

“विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ पोलिसांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. शाळा, पालक आणि पोलीस यांच्या समन्वयातून सुरक्षित व सक्षम पिढी घडविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शिक्रापूर पोलीस स्टेशन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत