शिरूर (अरुणकुमार मोटे) : राज्यमार्ग क्रमांक १०३ वर वाढत चाललेले खड्डे, उखडलेले डांबर आणि असंख्य धोकादायक वळणे यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही शिरूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सहाय्यक अभियंता आणि संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवलेली टाळाटाळ व अनास्था आता चव्हाट्यावर आली आहे.
सहाय्यक अभियंत्यांची निष्क्रियता, कार्यकारी अभियंता (पूर्व) यांचे दुर्लक्ष आणि अधीक्षक अभियंता यांच्याकडे कळवूनही काहीच बदल नाही. या निष्क्रियतेमुळे राज्यमार्ग १०३ आज जीवघेणा बनला आहे,” अशी तीव्र टीका सामाजिक कार्यकर्ता व व्हिसलब्लोअर निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी करत कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला.
राज्यमार्ग १०३ वरील स्थिती गंभीर असून अनेक भागांमध्ये रस्ता कोसळला आहे, खोल खड्डे पडले आहेत आणि वाहतूक अतिशय जोखमीची झाली आहे. नागरिकांनी विविध माध्यमांतून तक्रारी केल्या, प्रत्यक्ष भेटी घेऊन मागण्या मांडल्या; परंतु शिरूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने त्याकडे कायम दुर्लक्षच केले. सहाय्यक अभियंता हे पुणे येथे निवासी राहत असल्यामुळे त्यांचे या भागाकडे खूप मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. याच सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांच्याकडून वारंवार वेगवेगळी आश्वासने दिली जात असून, वास्तविक काम मात्र नाममात्रच, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी ‘काम सुरू आहे,’ असे सांगण्यात आले; मात्र १८ तारखेला प्रत्यक्ष पाहणी करताना फक्त वरवरचे, अशास्त्रीय काम आणि पुढील काम पूर्णपणे बंद असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
सहाय्यक अभियंता यांनी “काम अन्नापूर (येवलेमाथा) पर्यंत पोहोचले” अशी माहिती दिली होती. परंतु, जमिनीवरील प्रत्यक्ष स्थिती मात्र पूर्णपणे उलट होती. काम सुरूच नव्हते. ही दिशाभूल करणारी माहिती म्हणजे प्रशासकीय दायित्वाचा भंग, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी केलेला विनोद, असे तीव्र शब्दात वाळुंज यांनी म्हटले आहे. खोटेपणा उघडकीस आल्यानंतर काम बंद असण्याचे कारण म्हणून ‘मलठनचा मंगळवार बाजार’ सांगण्यात आले, हे कारण नागरिकांच्या सुरक्षेला जोखमीमध्ये टाकणारे आणि जबाबदारीपासून पळ काढणारे असल्याचा आरोप करण्यात आला.
या गंभीर परिस्थितीबाबत पुणे विभागीय अधीक्षक अभियंता बावीस्कर यांना देखील वेळोवेळी कळविण्यात आले. तथापि त्यांच्या स्तरावरही कोणतीही तातडीची कृती नाही, तपासणी नाही, आदेश नाही, अशी स्थिती कायम आहे. तसेच पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडूनही सुरुवातीपासून उदासीन प्रतिसाद मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यांच्या देखभालीबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही, त्याचे पालन न होणे म्हणजे संविधानातील कलम २१ — ‘जीवन आणि सुरक्षिततेचा अधिकार’ — याचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे. “ही कामे स्वप्रेरणेने व्हायला हवी होती; परंतु जनतेलाच आवाज उठवावा लागत आहे. हा प्रशासनाकडून जनतेवर होणारा छळ आहे,” अशी कठोर टीका वाळुंज यांनी केली.
प्रतिमा मलिन, पथदुरुस्ती न झाल्याने, वारंवार अपघात,वाहनांचे नुकसान, विद्यार्थ्यांचा व खासगी वाहनधारकांचा जीव धोक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण निष्क्रियतेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिमा मलिन होत असून नागरिकांचा विश्वास ढासळत चालला आहे.
‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमी नंतर रस्त्याच्या दुरुस्तीच काम सुरु…
शेतकऱ्यांना फक्त ७ दिवसांत मिळणार हक्काचा शेतरस्ता जाणून घ्या महसूल विभागाचा नवा आदेश
सविंदणे- लोणी रस्ता गेला खड्ड्यात, रस्त्याची दुरावस्था झाल्याने होतायेत अपघात
शिक्रापूर मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प; ग्रामस्थ आक्रमक, आंदोलन करण्याचा इशारा